वळणावरी जरासे , ती वळते आणीक हसते
सुटतात उखाणे सारे , प्रश्नाचे उत्तर मिळते
जलतरंग ऐकू येतो , अंतरात वाजे हलगी
भलभलत्या उनाड शंका , मग करू लागती सलगी
जाळ्यात गुलाबी माझे , मन हळूच मग गुरफटते
सुटतात उखाणे सारे , प्रश्नाचे उत्तर मिळते
जाणवते सूर गवसला , पण चुकतो आहे ताल ,
आशेच्या हिंदोळ्यावर , होतात जीवाचे हाल
अदमास तरी स्वप्नांचे , मन लावूनिया मोहरते ,
सुटतात उखाणे सारे , प्रश्नाचे उत्तर मिळते